Wednesday, October 7, 2009

आता रेशन कार्ड दाखवून सहकुटुंब मतदान!



मुंबई, दि. 7 ऑक्‍टोः विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी ओळख पटविण्यास रेशनकार्ड हा पुरावा ग्राह्य़ धरण्यात आला असला तरी हा पुरावा आणणाऱ्यांना संपूर्ण कुटुंबासह एकत्रितरित्या मतदानाला यावे लागणार आहे. रेशनकार्डच्या पुराव्याचा गैरवापर होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला असल्याची माहिती केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त नवीन चावला यांनी आज दिली.
बोगस रेशनकार्डद्वारे मतदानाचा प्रयत्न करणाऱ्यांवर त्वरित फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे सांगतानाच चावला यांनी, मतदानाला येणाऱ्या मतदाराला आपली ओळख पटविता यावी यासाठी रेशनकार्ड हा पुरावा ग्राह्य़ धरण्यात आला आहे. रेशनकार्डवर मतदाराचा फोटो नाही. त्यामुळे रेशनकार्डच्या पुराव्याचा गैरवापर होऊ शकतो. हे टाळण्यासाठी रेशनकार्ड घेऊन मतदान करण्यास येणाऱ्या एकटय़ा व्यक्तीला मतदान करू दिले जाणार नाही. त्यासाठी कुटुंबप्रमुखासह सर्व व्यक्तींनी एकत्रितपणे मतदानाला आले पाहिजे. त्या कुटुंबाची मतदान केंद्रस्तर अधिकारी वा खात्याच्या अन्य अधिकाऱ्यांमार्फत शहानिशा करण्यात येईल. त्यानंतरच मतदानाचा हक्क बजावता येणार आहे, असे स्पष्ट केले. निवडणुकीचे मतदान व मतमोजणी दरम्यान कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी राज्याच्या सीमांवर पोलीस तपासणी नाके (चेकपोस्ट) उभे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या तपासणी नाक्यांवर शस्त्रे, दारू यांची वाहतूक होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय निवडणुकीसाठी नेमलेले केंद्रीय निवडणूक निरीक्षक, विभागीय आयुक्त यांनी मतदानाच्या ४८ तास आधी मतदान केंद्रांची चोख पाहणी करावी अशीही सूचना करण्यात आल्याचे चावला यांनी सांगितले.
मतदान व मतमोजणी प्रक्रियेदरम्यान महिला कर्मचाऱ्यांचे सुविधांअभावी हाल होतात असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या सरमिसळ पद्धतीने होणाऱ्या नेमणुकीतून महिलांना वगळण्यात आले आहे. ज्या मतदान केंद्रांवर स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध आहेत अशा ठिकाणी महिलांची नेमणूक करण्यात येणार आहे, असेही त्यांनी नमूद केले. निवडणुकीच्या कामावर असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना पोस्टाद्वारे मतदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे तसेच त्याचे प्रशिक्षणही दिले आहे. मतदानापूर्वी मतदानाचे प्रात्यक्षिक (मॉक पोल) घेतले जाणार आहे, असेही चावला यांना सांगितले.

(लोकसत्‍ता, 8 ऑक्‍टोबर 2009)

No comments:

Post a Comment