Saturday, October 17, 2009

कोठारे भरलेली, पोटे रिकामी!

शुक्रवार, १६ ऑक्टोबर २००९ रोजीच्‍या लोकसत्‍तेचा अग्रलेख

गरिबी, भुकेलेपण आणि विषमता हे तीन शब्द समानार्थी नाहीत! या विभिन्न तीन स्थिती आहेत! हे तीन वेगवेगळे परिणाम आहेत! जगात गरिबी निर्माण होते ती जागतिक आर्थिक नियोजनातल्या गलथानपणापायी. भुकेलेल्यांची संख्या वाढते ती अन्नाचे वितरण नीट न झाल्यामुळे किंवा मुळात अन्नाचे उत्पादनच अपुरे झाल्यामुळे. विषमता हा परिणाम आहे सामाजिक संस्कृतीचे, मूल्यांचे आणि अर्थातच अर्थकारणाचे नीट नियोजन न होण्याचा. आफ्रिकेत हिऱ्यांच्या खाणी आहेत, पण म्हणून तिथल्या स्थानिकांची पोटे भरत नाहीत. कारण त्या खाणींची मालकी आहे युरोपातल्या धनदांडग्यांकडे. जागतिक अर्थकारणाचे गैरव्यवस्थापन ते हे. उपाशीपोटी राहणाऱ्यांची जागतिक संख्या शंभर कोटींवर जाऊन पोहोचली आहे अशी जी माहिती संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि शेती संघटनेच्या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या अहवालात देण्यात आली आहे, तिचा अर्थच हा की जगात प्रत्यक्ष अन्नधान्याचे उत्पादन वाढूनही जागतिक अर्थकारणाचे नियोजन अंदाधुंदीचे आहे. सर्वाधिक भुकेले हे आशियात आणि प्रशांत महासागराच्या क्षेत्रात असणाऱ्या देशांमध्ये आहेत. संपूर्ण जगाची लोकसंख्या सहा अब्ज आहे, तर त्यापैकी एकषष्ठांश एवढे भुकेले आहेत. हेच प्रमाण भारतालाही लागू होते, असे गृहीत धरले तर भारतात ६० कोटी ते ६५ कोटी एवढी लोकसंख्या उपाशीपोटी राहणाऱ्यांची आहे, असे मानावे लागते; परंतु आशिया आणि प्रशांत क्षेत्रात असणाऱ्या देशांमध्ये असणारी एकूण अतिशय गरिबांची संख्या ६०-६५ कोटींच्या घरात असल्याचे आकडेवारी सांगते. आपल्या सत्ताकारण्यांनी हायसे वाटून घ्यावे, अशी मात्र ही स्थिती नाही. सध्या दिवाळीचे दिवस आहेत. रस्तोरस्ती वाढती गर्दी आहे. दुकानांमध्ये भरपूर खरेदी होताना दिसते आहे. सोन्याचे भाव दहा ग्रॅमला १६ हजारांवर पोहोचले तरी सोने खरेदी करणाऱ्यांची गर्दी हटत नाही. मोठय़ा किमतीचे डिजिटल टीव्ही, उंची फ्रीज खरेदी करणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होते आहे. ‘शोरूम’मध्ये मोटारींच्या आलिशान मॉडेल्सचीही भर पडते आहे आणि त्या घेणाऱ्यांची संख्याही डोळय़ांवर येईल, अशी आहे. सेन्सेक्सही वाढतो आहे आणि तरीही दारिद्रय़ात वाढ होते आहे, उपाशीपोटी राहणाऱ्यांची संख्या वाढते आहे, हे अजब आहे बुवा, असे झगमगत्या भारतात राहणाऱ्या नवश्रीमंत आणि उच्च मध्यमवर्गीयांना वाटत असेल. ते स्वाभाविक आहे, कारण त्यांची दुनिया ही नाही. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि शेती संघटनेला संपूर्ण जगातल्या भुकेलेल्यांची संख्या २०१५ पर्यंत निम्म्यावर आणायची आहे आणि जगात एकही उपाशीतापाशी राहणार नाही आणि कुणाचाही भूकबळी जाणार नाही, हे त्यांना पाहायचे आहे. हे दारिद्रय़ भारतासारख्या विकसनशील देशामध्येच पाहायला मिळते. सर्वाधिक श्रीमंत असणाऱ्या २२ देशांकडून विकसनशील देशांना दिल्या जाणाऱ्या मदतीचे प्रमाण एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या ०.७ टक्के तरी असावे, असे २००२ मध्ये निश्चित करण्यात आले होते. प्रत्यक्षात अमेरिकेसारख्या देशाकडून या देशांना शस्त्रास्त्रांची, लढाऊ विमानांची मदत दिली जाते, पण दारिद्रय़ हटवण्यासाठीच्या मदतीत कपात करण्यात येते. दारिद्रय़निर्मूलनासाठीची सध्याची मदत एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या ०.४ ते ०.५ टक्के एवढीच आहे. थोडक्यात २२५ अब्ज डॉलरवरून मदतीचा हा आकडा १०६ अब्ज डॉलर एवढा घसरला आहे. याच काळात अमेरिकेचा शस्त्रास्त्रांवर केला जाणारा खर्च मोठय़ा प्रमाणावर वाढला आहे. ‘द एन्ड ऑफ पॉव्हर्टी’ या पुस्तकाचे लेखक जेफ्री सॅक्स यांच्या मते जगात असणारे आत्यंतिक दारिद्रय़ आता आपल्या नातवंडांच्या काळापर्यंतही नष्ट होईल अशी शक्यता नाही. जेफ्री सॅक्स हे अमेरिकेच्या कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या ‘अर्थ इन्स्टिटय़ूट’चे संचालक आणि अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. शंभरावर देशांमध्ये त्यांनी दारिद्रय़ावस्थेची अत्यंत सखोल म्हणता येईल, अशी पाहणी केली आहे. त्यांनी दिलेली आकडेवारी तर थक्क करून सोडणारी आहे. सध्याची जी आत्यंतिक दारिद्रय़ावस्था आहे, ती संपूर्ण जगात रोज २० हजार जणांचे भूकबळी घेते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सरचिटणीसपदी कोफी अन्नान असताना सॅक्स हे त्यांचे या क्षेत्रातले विशेष सल्लागार होते. सॅक्स यांच्यापुढे सध्या जी सगळय़ात मोठी आव्हानात्मक गोष्ट आहे, ती म्हणजे दरवर्षी आठ लाख २९ हजार बालकांना वाचवायची. एवढी मुले दरवर्षी केवळ भुकेपोटी मृत्युमुखी पडतात, असे त्यांनी म्हटले आहे. मालावीसारख्या देशात लिलाँग्वे या राजधानीच्या शहरापासून एका खेडय़ात जात असताना त्यांना काहीशी विचित्र स्थिती आढळली. मुले पाण्यासाठी भांडी घेऊन अनवाणी जाताना त्यांनी पाहिली. वयस्कर महिला लाकूडफाटा गोळा करून चाललेल्या त्यांनी पाहिल्या, म्हातारीकोतारी माणसेही पाहिली, पण तरुण मुला-मुलींचे दर्शन त्यांना झाले नाही. म्हणून त्यांनी गावात शिरताच ज्येष्ठ नागरिकांना प्रश्न केला, की तरुण मंडळी कुठे कामाला गेली आहेत का? त्यावर त्यांना जी माहिती मिळाली, ती धक्कादायक होती. गावातली सर्व तरुण-तरुणी ‘एड्स’ला बळी पडली होती! सॅक्स यांच्या मते अमेरिकेवरील ११ सप्टेंबर २००१ च्या हल्ल्यानंतर अमेरिकेने दरवर्षी ५०० अब्ज डॉलरएवढा जादा खर्च जो लष्करावर केला आहे, त्या रकमेच्या एकतीसांश एवढी रक्कम म्हणजेच सुमारे १६.६ अब्ज डॉलर जर अमेरिकेने जगातील गरिबातल्या गरिबांसाठी खर्च करायचे म्हटले तरी जगातले हे दारिद्रय़ नष्ट व्हायला मदत होईल. म्हणजेच जगातील अर्थकारणाचे आणि जीवनावश्यक सामगी्रचे नीट व्यवस्थापन, अन्नधान्याचे योग्य प्रकारे वितरण त्यांना अभिप्रेत आहे. अमेरिकेने शस्त्रास्त्रांवर केला जाणारा खर्च कमी करून ही मदत देऊ केली तर जागतिक दारिद्रय़ हटवायला २०२५ चीही वाट पाहायची आवश्यकता नाही, असे ते म्हणतात. दारिद्रय़ाची व्याख्या करायला आपल्याकडे प्रख्यात अर्थतज्ज्ञ सुरेश तेंडुलकर यांची समिती नेमण्यात आली आहे. याच सुमारास केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने एन. सी. सक्सेना यांची एक समिती नेमून ग्रामीण गरिबांच्या संख्येची माहिती घ्यायचे निश्चित केले आहे. सक्सेना यांच्या मते दारिद्रय़रेषेखालील ग्रामीण गरिबांची संख्या ५० टक्क्यांवर असण्याची शक्यता आहे. सक्सेना यांच्या समितीचा अहवालही अजून प्रसिद्ध झालेला नाही. तो हाती पडेल तेव्हा आपल्याही विकासाच्या भ्रमाचा भोपळा फुटेल. मुळात दारिद्रय़रेषेची व्याख्याही आता बदलते आहे. ग्रामीण आणि शहरी भागात अन्नातून मिळणाऱ्या उष्मांकांवर आता ही दारिद्रय़रेषा निश्चित करायला हवी, असे मानले तर ग्रामीण भागात दरडोई मासिक ७०० रुपये आणि शहरी भागात दरडोई मासिक १००० रुपये उत्पन्न हे दारिद्रय़रेषेखालचे मानायला हवे. जागतिक निकषांनुसार केवळ मिळणाऱ्या अन्नावरच दारिद्रय़रेषा निश्चित केली जाऊ नये, तर डोक्यावरच्या छपरावरही (निवारा) ते अवलंबून धरण्यात यावे. ही नवी व्याख्या आधारभूत मानली तर मुंबई शहरातली निम्मी लोकसंख्या दारिद्रय़रेषेखाली जाईल. म्हणजेच मुंबईची नवी व्याख्या ‘महाखेडे’ अशी करावी लागेल. थोडक्यात या नव्या व्यवस्थेने ग्रामीण-शहरी ही दरी नष्ट करून टाकली आहे. केंद्रीय नियोजन मंडळाच्या आकडेवारीनुसार दारिद्रय़रेषेखाली असणाऱ्यांची संख्या भारतात लोकसंख्येच्या ३६ टक्के एवढी म्हणजेच सरासरी सहा कोटी ५२ लाख कुटुंबांएवढी आहे. सुरेश तेंडुलकरांच्या पाहणीनुसार तर दारिद्रय़रेषेखाली जीवन जगणाऱ्यांची संख्या ३८ टक्क्यांवर जाऊन पोहोचते. पंजाब, हरयाणा या राज्यांमध्ये दारिद्रय़रेषेखाली असणाऱ्यांची संख्या अवघी सात-आठ टक्के आहे, तर ओरिसा, बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड या राज्यांमध्ये ती सर्वाधिक म्हणजे ४० ते ५० टक्के या दरम्यान आहे. प्रा. वि. म. दांडेकर आणि प्रा. नीलकंठ रथ यांच्या समितीने १९६०-६१ मध्ये दारिद्रय़रेषेखालच्या जीवनासाठी दरडोई दरमहा १८ रुपये किमान उत्पन्न गृहीत धरले होते. ते १९७३ च्या अन्नधान्याच्या भावानुसार ग्रामीण आणि शहरी व्यक्तींसाठी अनुक्रमे ४९ आणि ५६ रुपये होते. जागतिक बँकेच्या व्याख्येनुसार दरडोई एक डॉलर (सुमारे ५० रुपये) एवढाही दैनंदिन खर्च करू न शकणाऱ्यांना दारिद्रय़रेषेखाली असल्याचे मानले जाते. बहुराष्ट्रीय कंपन्या आल्या, गुंतवणूक वाढली, रस्ते चकचकीत झाले, उड्डाणपूल उभे राहिले, मोटारी वेगाने धावू लागल्या, तरी या दिखाऊ प्रगतीने भुकेलेल्यांच्या पोटात अन्नाचे दोन घास जाऊ शकतील, अशी शक्यता नाही. ही अवस्था दूर करायची तर जागतिक अर्थकारणाचीच पुनर्माडणी करावी लागेल अशी मागणी संयुक्त राष्ट्रांकडे पं. जवाहरलाल नेहरूंनी आणि नंतर इंदिरा गांधींनीही केली होती. त्या दूरदृष्टीच्या मागणीकडे झालेले दुर्लक्ष म्हणजेच ढासळलेले नियोजन आणि कमालीची बेपर्वा वृत्ती. भुकेलेल्याच्या वाढलेल्या संख्येमागची ही कारणे दुर्लक्षितच आहेत.

Thursday, October 15, 2009

अन्नधान्याऐवजी फसवी आश्वासने


13 Oct 2009 रोजी महाराष्‍ट्र टाईम्‍समध्‍ये आलेला उल्‍का महाजन यांचा लेख

अन्नधान्य सुरक्षा आणि रेशन याबाबत प्रस्थापित पक्षांनी जाहीरनाम्यांत दिलेली आश्वासने ही जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणारी कशी आहेत, याचा हा पंचनामा...

निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरलेल्या सर्व पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध झाले आहेत. सामान्य जनता महागाईमुळे होरपळून निघत असताना एका बाजूला निवडणूक प्रचाराच्या नावाखाली प्रस्थापित पक्षांकडून कोट्यवधी रुपये अक्षरश: उधळले जात आहेत. तर दुसऱ्या बाजूला निवडून आल्यावर काय करणार, त्या आश्वासनांची खैरात जाहीरनाम्याद्वारे सुरू आहे.

त्यापैकी अन्नधान्य सुरक्षा व रेशनबाबत दिली जाणारी आश्वासने व त्याद्वारे होणारी धूळफेक कशी होत आहे तेवढेच तूर्तास पाहू.

काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीच्या जाहीरनाम्यात २५ किलो धान्य (तांदूळ + गहू) दारिद्यरेषेखालील सर्व कुटुंबांना ३ रु. किलो दराने देण्याच्ेा आश्वासन आहे. हेच आश्वासन लोकसभा निवडणुकांदरम्यान काँग्रेसने राष्ट्रीय स्तरावर दिले होते.

सध्या ३५ किलो रेशन (तांदूळ + गहू) अंत्योदय कार्डधारकांना व दारिद्यरेषेखालील कुटुंबांना देय आहे. त्यामध्ये अंत्योदय योजनेन्वये २ रु. किलो दराने गहू १० किलो व ३ रु. प्रतिकिलो दराने तांदूळ २५ किलो मिळतो. तर ज्यांच्याकडे दारिद्यरेषेखालचे कार्ड आहे त्यांना ५ रु. किलो दराने गहू व ६ रु. किलो दराने तांदूळ मिळतो.

प्रत्यक्षात केंद सरकारकडून राज्य शासनाला मिळणाऱ्या गहू व तांदळाचा भाव दारिद्यरेषेखालील कार्डांसाठी अनुक्रमे ४.१५ रु. व ५.६० रु. प्रतिकिलो आहे. त्यात आपली सबसिडी घालणे तर सोडाच, त्यामध्ये वाहतूक खर्चही ग्राहकाकडूनच भागवून महाराष्ट्र शासन हे गहू व तांदूळ ५ व ६ रु.ला विकते, तेही दारिद्यरेषेखालील लोकांना.

दारिद्यरेषेखाली कोण आहेत हे ठरवण्यासाठी तर शासन कमालीचे वैचारिक दारिद्य दाखवते.

शेजारचे छत्तीसगडसारखे छोटे व तुलनेने आथिर्कदृष्ट्या मागास राज्य हेच धान्य आतापर्यंत स्वत:ची राज्याची सबसिडी घालून ७० टक्के लोकांना ३ रु. दराने देत आले. या एकाच कार्यक्रमावर तेथे रमणसिंगाचे सरकार विक्रमी मताधिक्याने पुन्हा सत्तेवर आले.

यातील सत्तेचे गाजर जाणवताच महाराष्ट्रातील काँग्रेस आघाडीने दारिद्यरेषेखालील सर्व कार्डधारकांना ३ रु. दराने धान्य देण्याची घोषणा केली आहे. पण त्यातही लबाडी केली आहेच. ते देताना औदार्य तर सोडाच, सौदेबाजीच केली आहे. कारण याच दराने सर्व राज्यांना धान्य देण्याची केंद सरकारने आधीच घोषणा केली आहे. म्हणजे महाराष्ट्र शासनाला यात आपली सबसिडी घालण्याची आवश्यकता तर नाहीच, पण केंद व राज्य दोघांनीही हे प्रमाण १० किलोने कमी करून २५ किलोवर आणले आहे. हे केल्याने दारिद्यरेषेखालील कुटुंबाच्या लाभात भर पडलेली नाही. उलट तोटाच झाला आहे. यापूवीर् ३५ किलोसाठी दारिद्यरेषेखालील कुटुंबाला २०० रु. खर्च करावे लागत होते. आता २५ किलो ३ रु. दराने तर उर्वरित १० किलो बाजारभावाने घेतल्यास त्याच ३५ किलो धान्यासाठी त्यांना २४५रु. खर्च करावे लागणार आहेत. म्हणजे गरीब कुटुंबावरचा बोजा या नव्या घोषित कार्यक्रमामुळे ४५ रुपयांनी वाढला आहे. मात्र आपण अधिक उदार असल्याचा आव आणत सरकार मात्र जनतेला डोळ्यात धूळफेक करत आहे.

सध्याच्या प्रचारमोहिमेत देशाचे कृषी व अन्न, नागरी पुरवठा मंत्री गव्हाचे विक्रमी उत्पादन झाल्याने गहू ठेवायला जागा नसल्याचे अभिमानाने सांगत आहेत, मग रेशनवरचा कोटा कमी का करण्यात येतो? धान्याचा तुटवडा नाही तर ३५ किलोचा कोटा २५ किलोवर का येतो?

तसेच भाताची कापणी होण्यापूवीर्च तांदळाचा यंदा तुटवडा होणार असल्याची घोषणा करून कृषीमंत्र्यांनी साठेबाज व्यापाऱ्यांना इशारा दिला आहेच. त्याआधी २५०० कोटींचा तांदूळ घोटाळाही, गरजू देशांना माणुसकीच्या भावनेतून स्वस्त दराने तांदूळ देण्याच्या भानगडीत, आपल्या देशातील गरीब व सामान्य जनतेला तांदूळ न मिळता, तो आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यातबंदी असतानाही पोचला. या प्रकरणी गेल्या अधिवेशनात संसदेत बराच वादंग झाला. पण निवडणुकीपर्यंत विरोधकही हा मुद्दा बहुदा विसरून गेले.

लबाड्या करून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाठवण्यासाठी तांदूळ उपलब्ध होतो, तोही निर्यातबंदी असताना, मात्र जनतेला तांदूळ मिळत नाही. त्याचा कोटा कमी केला जातो.

दारिद्यरेषेवरील कार्डधारकांना म्हणजेच केशरी कार्डधारकांनाही ३५ किलो धान्य आतापर्यंत देय होते. पण ते तर कधीच मिळाले नाही; कारण केंदाने दिलेल्या कोट्यातून केशरी कार्डधारकाचा धान्यकोटा महाराष्ट्र शासनाने कधी उचललाच नाही. शासनाच्याच अहवालानुसार मार्च २००७ पर्यंत केंदाने दिलेल्या धान्य कोट्यापैकी १७ लाख १५ हजार मे. टन तांदूळ व पाच लाख सत्तर हजार मे. टन गहू महाराष्ट्र शासनाने उचलला नाही. त्यामुळे केशरी कार्डधारकांना धान्यच मिळेना, आम्ही गेल्या वषीर् महाराष्ट्रातील १९ जिल्ह्यांत एकाच दिवशी आसूड मोचेर् काढले. आश्वासने मिळाली. पण धान्य नाही. आणि आता तर या कार्डावरचे धान्याचे प्रमाण ३५ किलोवरून १५ किलोवर खाली आणण्यात आले आहे.

महागाई वाढते आहे. धान्याची गरज व रेशनवर ते स्वस्त दरात देण्याची गरज वाढते आहे. मात्र सरकार हात आखडता घेत आहे. आणि आव मात्र आणते आहे औदार्याचा.

या खोट्या उदार चेहऱ्याचा मुखवटा फाडण्याची गरज आहेे. तसेच सेना-भाजप युतीच्या जाहीरनाम्यात तर सगळी रेशन यंत्रणा, शेतकऱ्यांना हमी भाव देणारी व्यवस्था गुंडाळून फूड स्टॅम्प देण्याची घोषणा आहे. ही तर आगीतून फुफाट्यात नेणारीच वाट आहे.

आताच रेशन दुकानावर नियंत्रण ठेवणारी सर्व व्यवस्था असताना गरीब कुटुंबापर्यंत धान्य पोचू शकत नाही. खुल्या बाजारात गरीब फेकला गेल्यावर तर ही स्थिती आणखीच दयनीय व बिकट होईल. हा अनुभव अन्य देशांनी आधीच घेतला आहे. जिथे फूड स्टॅम्पची योजना सुरू झाली, तिथे रेशन व्यवस्था संपवण्याचाच तो डाव होता हे उघड झाले आहे. त्यामुळे फूड स्टॅम्पची योजना तर परतवूनच लावायला हवी.

या तुलनेत रिडालोसच्या जाहीरनाम्यात फक्त दारिद्यरेषेखालील कुटुंबांनाच नव्हे, तर सर्वच गरजू कुटुंबांना पूवीर्प्रमाणे सार्वत्रिक रेशन देण्याचे आश्वासन आहे. त्याचे स्वागत करायला हवे.

मात्र निवडणुकीच्या या धूळफेकीत महागाईने होरपळणाऱ्या सामान्य जनतेच्या अन्नसुरक्षेचा प्रश्ान् परिघाबाहेर फेकला जातो आहे व भ्रामक आश्वासनांच्या भूलथापांवर प्रस्थापित पक्ष जनतेला झुलवत आहेत, हे किमान नजरेला आणावे हाच या लेखप्रपंचामागचा उद्देश.

- उल्का महाजन
सर्वहारा जनआंदोलन

Wednesday, October 7, 2009

आता रेशन कार्ड दाखवून सहकुटुंब मतदान!मुंबई, दि. 7 ऑक्‍टोः विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी ओळख पटविण्यास रेशनकार्ड हा पुरावा ग्राह्य़ धरण्यात आला असला तरी हा पुरावा आणणाऱ्यांना संपूर्ण कुटुंबासह एकत्रितरित्या मतदानाला यावे लागणार आहे. रेशनकार्डच्या पुराव्याचा गैरवापर होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला असल्याची माहिती केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त नवीन चावला यांनी आज दिली.
बोगस रेशनकार्डद्वारे मतदानाचा प्रयत्न करणाऱ्यांवर त्वरित फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे सांगतानाच चावला यांनी, मतदानाला येणाऱ्या मतदाराला आपली ओळख पटविता यावी यासाठी रेशनकार्ड हा पुरावा ग्राह्य़ धरण्यात आला आहे. रेशनकार्डवर मतदाराचा फोटो नाही. त्यामुळे रेशनकार्डच्या पुराव्याचा गैरवापर होऊ शकतो. हे टाळण्यासाठी रेशनकार्ड घेऊन मतदान करण्यास येणाऱ्या एकटय़ा व्यक्तीला मतदान करू दिले जाणार नाही. त्यासाठी कुटुंबप्रमुखासह सर्व व्यक्तींनी एकत्रितपणे मतदानाला आले पाहिजे. त्या कुटुंबाची मतदान केंद्रस्तर अधिकारी वा खात्याच्या अन्य अधिकाऱ्यांमार्फत शहानिशा करण्यात येईल. त्यानंतरच मतदानाचा हक्क बजावता येणार आहे, असे स्पष्ट केले. निवडणुकीचे मतदान व मतमोजणी दरम्यान कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी राज्याच्या सीमांवर पोलीस तपासणी नाके (चेकपोस्ट) उभे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या तपासणी नाक्यांवर शस्त्रे, दारू यांची वाहतूक होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय निवडणुकीसाठी नेमलेले केंद्रीय निवडणूक निरीक्षक, विभागीय आयुक्त यांनी मतदानाच्या ४८ तास आधी मतदान केंद्रांची चोख पाहणी करावी अशीही सूचना करण्यात आल्याचे चावला यांनी सांगितले.
मतदान व मतमोजणी प्रक्रियेदरम्यान महिला कर्मचाऱ्यांचे सुविधांअभावी हाल होतात असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या सरमिसळ पद्धतीने होणाऱ्या नेमणुकीतून महिलांना वगळण्यात आले आहे. ज्या मतदान केंद्रांवर स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध आहेत अशा ठिकाणी महिलांची नेमणूक करण्यात येणार आहे, असेही त्यांनी नमूद केले. निवडणुकीच्या कामावर असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना पोस्टाद्वारे मतदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे तसेच त्याचे प्रशिक्षणही दिले आहे. मतदानापूर्वी मतदानाचे प्रात्यक्षिक (मॉक पोल) घेतले जाणार आहे, असेही चावला यांना सांगितले.

(लोकसत्‍ता, 8 ऑक्‍टोबर 2009)

आव्हान आहे ते रोहयोतील प्रशासकीय सुधारणांचे!

आजच्‍या लोकसत्‍तेतील 'लोकमानस'मध्‍ये अग्रलेखावर आलेली प्रतिक्रिया
हे बरे झाले की, राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या नामकरणाच्या निमित्ताने एक अग्रलेख लोकसत्ताला लिहावासा वाटला. आपली प्रत्येक कृती ही समाजातील शेवटच्या माणसाचा विचार करून ठरावी या महात्मा गांधींच्या तत्त्वाला अनुसरून त्या तळातील माणसासाठीच्या या योजनेचे नवीन नामकरण योग्यच आहे. अग्रलेखात मांडले गेलेले वस्तुस्थितीचे भेदक दर्शनही तितकेच खरे.
रोजगार हमीच्या भ्रष्टाचाराबद्दल चर्चा खूप होते. रोहयोसंबंधी जे ऐकायला, पाहायला मिळते त्यात भ्रष्टाचाराच्या कथाच जास्त असतात. असे का व्हावे? भारतात अशी कोणती योजना आणि प्रकल्प असू शकतात की जिथे भ्रष्टाचार नाही? जितका मोठा प्रकल्प तितका अधिक भ्रष्टाचार हे आपल्या सर्वाना माहीत आहे. उदा. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे झाला. त्यात भ्रष्टाचार झाला नसेल? नाशिक-मुंबई चौपदरी रस्ता असो वा विदर्भातील रस्ते असोत, यामध्ये भ्रष्टाचार झालेला नसेल? तो उघडकीला आला नसेल. पण म्हणून तो झाला नसेल असे कोणी म्हणेल तर ते हास्यास्पद ठरेल. मग रोहयोतील भ्रष्टाचाराबद्दल आपण का जास्त बोलतो? रोहयो व भ्रष्टाचार हे जणू एकाच अर्थाचे शब्द का वाटतात?
याची दोन कारणे असू शकतात. पहिले म्हणजे इतर प्रकल्प, योजना यांच्या तुलनेत रोहयो समाजातील सर्वात गरीब घटकाला थेटपणे लाभ पोहोचवते आणि त्यामुळे त्यातील भ्रष्टाचार जास्त चीड आणतो. ही प्रतिक्रिया साहजिक व स्वागतार्ह आहे. दुसरे कारण म्हणजे रोहयोपेक्षाही प्रचंड मोठय़ा खर्चाच्या योजनातील भ्रष्टाचार खूपच मोठा असला तरी उघडकीला येत नाही. रोहयोतील भ्रष्टाचार उघडकीला येतो.
खरे तर रोहयोतील भ्रष्टाचार इतर कंत्राटदरांच्या कामातील भ्रष्टाचारापेक्षा करायला अवघड. टक्केवारी ठरवून देवाण-घेवाण होते तेव्हा भ्रष्टाचार कागदोपत्री सापडणे कठीण. पण रोहयोमध्ये भ्रष्टाचार करताना मस्टर, एम. बी., मजुरी पत्रकात अतिशय कल्पकतेने वास्तव निर्माण करावे लागते. प्रथमदर्शनी तरी आकडेवारीची जुळवाजुळव चुकीची वाटता कामा नये ही खबरदारी घ्यावी लागते आणि म्हणून कागदपत्रे किंवा प्रत्यक्ष काम जरासे उकरून पाहिले की भ्रष्टाचार उघडकीस पडतो. मग हीच योजना बदनामीला बळी पडते. खरे तर इतर सर्व विकासाच्या व कल्याणकारी योजनांत भ्रष्टाचार आहेच.
रोहयोच्या भ्रष्टाचाराबद्दल संताप व्यक्त करताना आपण हे भान जागृत ठेवले पाहिजे. या स्वागतार्ह संतापाचे रूपांतर सीनिसिझममध्ये होता कामा नये. त्याचे रूपांतर या योजनेची परिणामकारकता वाढवण्यासाठी काय उपाय करता येतील या चर्चेमध्ये व्हायला हवे. धरणे, कालवे, रस्ते यात भ्रष्टाचार होतो म्हणून आपण हे प्रकल्प होऊ नयेत, असे म्हणत नाही.
महत्त्वाचा मुद्दा हा की, भ्रष्टाचार होतो आहे हे समजतेय, तर पुढे काय? हीच योजना अधिक प्रभावी व कार्यक्षम होणे शक्य आहे. त्यासाठी प्रशासकीय सुधारणांची गरज आहे.
आपल्या मूळच्या रोहयोमध्ये व राष्ट्रीय योजनेतील महत्त्वाचे फरक म्हणजे आता पारदर्शकता वाढलेली आहे. यात आधुनिक तंत्रज्ञानाचेही मोठे योगदान आहे. ग्रामपंचायतीकडे महत्त्वाची भूमिका आहे व चावडीवाचन हा कायद्यातच अंतर्भूत केले आहे. या योजनेचे जनक म्हणून आपण स्वत:बद्दल रास्त अभिमान बाळगतो आणि मग कर्तृत्वशून्य पद्धतीने या कायद्याची अंमलबजावणी करतो.
या योजनेच्या राष्ट्रीय वेबसाइटवर भारतातील प्रत्येक गावातील रोहयोच्या कामासंबंधित विविध आकडेवारी अद्ययावत व नेमकेपणी त्या त्या स्वरूपात मिळावी अशी सोय आहे. यासाठी राज्यांना निधीही उपलब्ध करून दिलेला आहे. आणि तरीही आपल्या राज्यातील कोणत्याही जिल्ह्याने, तालुक्याने हे मनावर घेतलेले नाही. आपण आंध्रप्रदेश सरकारच्या रोहयोच्या वेबसाइटवर गेलो तर अद्ययावत आकडेवारी पाहायला मिळते. पण आपल्या राज्यातील जिल्ह्याची कधीच मिळत नाही. हे आपल्या पुरोगामी महाराष्ट्राचे देदीप्यमान कर्तृत्व! वाय. एस. राजशेखर रेड्डी पुन्हा निवडून येण्यात आंध्रप्रदेशात प्रभावीपणे राबवण्यात आलेल्या रोहयोचे मोठे योगदान होते असे विश्लेषण बहुतेक राजकीय विश्लेषकांनी केले आहे, ते उगीच नाही. आकडेवारी पाहायला मिळाली की, त्याच्या थोडय़ाशा विश्लेषणातून, तुलनात्मक अभ्यासातून गैरव्यवहार लक्षात येऊ शकतो व तो ताबडतोब चव्हाटय़ावर आणता येऊ शकतो. पण रोहयोच्या गैरव्यवहारातील मेख इथेच आहे. गैरव्यवहार, भ्रष्टाचार आहे हे समजले. मग पुढे तक्रार कोण करणार? कोणाविरुद्ध करणार? चौकशी कोण करणार?
रोहयोचा गरजवंत मजूर पुरुष/महिला हे अत्यंत हलाखीचे व कोणतीही राजकीय ताकद नसलेले आयुष्य जगत असतात. त्यांच्यामध्ये स्थानिक प्रशासनाशी तक्रार करून पंगा घेण्याची हिंमत नसते. दुसऱ्या कोणा नागरिकाने त्यांच्या वतीने तक्रार नोंदवायची तर आपण एका कर्मचारी/ अधिकाऱ्याची तक्रार त्याच्या वरिष्ठांकडे करावी अशी पद्धत आहे. यावर चौकशीची गरज वाटलीच तर त्यांच्यातल्याच कोणा एका अधिकाऱ्यावर सोपविण्यात येते. यातून न्याय मिळू शकतो का? अंपायरशिवाय क्रिकेटची मॅच असू शकते का? गडी बाद करताना सर्व मिळून योग्य निर्णय घेऊ शकत नाहीत या तत्त्वावर आधारितच अंपायर ही संकल्पना रुजू झाली. अशी यंत्रणा रोहयोच्या तक्रारी मांडण्यासाठी, त्यावर कार्यवाही होण्यासाठी उपलब्ध नाही. हे होईपर्यंत गैरव्यवहाराला आळा बसणार कसा?
माहितीच्या अधिकाराशी रोहयोची तुलना करूया. सरकारचा कारभार अधिक खोलात समजून घेण्यासाठी माहिती मिळवून संबंधित प्रश्न उपस्थित करता येऊ शकतात. माहितीचा अधिकार प्रभावीपणे का वापरला जातो? त्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. माहितीच्या अधिकारात अर्जदारास समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर त्या प्रशासकीय कार्यालयातील संबंधित जनमाहिती अधिकाऱ्यास वैयक्तिकरीत्या जबाबदार ठरवले आहे. यामुळे अंमलबजावणीतील परिणामकारकता वाढली. अशी वैयक्तिक जबाबदारी रोहयोच्या संबंधात कोणावर आहे? कायद्यात जिल्हाधिकारी सर्वतोपरी जबाबदार असे मानले आहे. पण ज्याप्रमाणे माहितीच्या अधिकारात जनमाहिती अधिकाऱ्यास दंड ठोठावला आहे, तसे रोहयोमध्ये नाही. काम काढले नाही तर, बेकारी भत्त्याची शिक्षा संपूर्ण प्रशासनावर आहे. वैयक्तिकरीत्या अधिकाऱ्याच्या खिशातून तो पैसा जात नाही. त्यातून बेकार हा भत्त्यासाठी पात्र आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारीही त्या गरीब नडलेल्या मजुरावरच आहे. म्हणून हे शस्त्र निरुपयोगीच ठरलेले आहे.
तेव्हा आता आव्हान आहे ते रोहयोतील प्रशासकीय सुधारणांचे. निवडणुकीच्या माहोलमध्ये या विषयाचा साधा उच्चार कोणत्याही पक्षाकडून/उमेदवाराकडून किंवा लोकशाहीतील चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या मीडियाकडून होताना दिसत नाही. म्हणूनच लोकसत्ताने अग्रलेख लिहून रोहयोला योग्य ते महत्त्व दिले हे अभिनंदनीय आहे.
अश्विनी कुलकर्णी

Tuesday, October 6, 2009

आपल्‍या हक्‍काचे रेशन मिळवा !

अलिकडेच महागाई तसेच विधानसभा निवडणुकांच्‍या पार्श्‍वभूमीवर रेशनवर काही नवीन गोष्‍टी देण्‍याचे महाराष्‍ट्र सरकारने जाहीर केले. 27 ऑगस्‍ट 2009 रोजी तसा शासन निर्णयही सरकारने काढला. त्‍याप्रमाणे खालील वस्‍तू आपल्‍याला मिळणार आहेत. आपापल्‍या रेशन दुकानांवर जाऊन त्‍यांची मागणी करा व त्‍या पदरात पाडून घ्‍या. जर या वस्‍तू रेशन दुकानावर नसतील अथवा खराब असतील, वेळेवर मिळत नसतील, तर त्‍याबद्दल दुकानातील तक्रारवहीत तसेच रेशन अधिका-यांकडे तक्रार करा. यासंबंधातील अधिक माहितीसाठी रेशनिंग कृती समितीच्‍या स्‍थानिक कार्यकर्त्‍यांना संपर्क करा.


केशरी कार्डधारक

क्र.

वस्‍तू

दर (रु./कि.)

प्रमाण

(दरमहा)

1

गहू

7.20

दोन्‍ही मिळून 15 किलो

2

तांदूळ

9.60

3

साखर

20

2 किलो

4

तूरडाळ

55

1 किलो

5

पामतेल

30

1 लीटर

पिवळे कार्डधारक (बीपीएल)

क्र.

वस्‍तू

दर (रु./कि.)

प्रमाण

(दरमहा)

1

गहू

5

दोन्‍ही मिळून 35 किलो

2

तांदूळ

6

3

साखर

13.50

माणशी 500 ग्रॅम

4

तूरडाळ

55

1 किलो

5

पामतेल

30

1 लीटर

अंत्‍योदय कार्डधारक

क्र.

वस्‍तू

दर (रु./कि.)

प्रमाण

(दरमहा)

1

गहू

2

दोन्‍ही मिळून 35 किलो

2

तांदूळ

3

3

साखर

13.50

माणशी 500 ग्रॅम

4

तूरडाळ

55

1 किलो

5

पामतेल

30

1 लीटर

अन्‍नपूर्णा कार्डधारक

क्र.

वस्‍तू

दर (रु./कि.)

प्रमाण

(दरमहा)

1

गहू

मोफत

दोन्‍ही मिळून 10 किलो

2

तांदूळ

3

साखर

13.50

माणशी 500 ग्रॅम

4

तूरडाळ

55

1 किलो

5

पामतेल

30

1 लीटर

रेशन आपल्‍या हक्‍काचं-संघटित होऊन मिळवायचं !